शबनम न्यूज | प्रतिनिधी
बिटकॉइन व इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून आकुर्डी परिसरातील एका नागरिकाची तब्बल ३१ लाख ३५ हजार ४० रुपये ऑनलाईन फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी दि. ७ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत spiritfirecoin.com या संकेतस्थळावर लॉगिन करून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी ‘आदिती मॅडम’, ‘संतुजना’ तसेच ‘अरुण रॉय’ नावाच्या व्यक्तींनी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधत मार्गदर्शन केले. त्यानंतर फिर्यादी यांना “BIG DEALS 746” नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून विविध क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले.
आरोपींच्या सूचनेनुसार फिर्यादी यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे जमा केले. संकेतस्थळावर त्यांच्या खात्यात १.४६ बिटकॉइन व १९,२०० USDT, अशी सुमारे ८८ लाख ९९ हजार रुपयांची आभासी रक्कम दिसत होती. मात्र, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही रक्कम मिळाली नाही.
याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांचा क्रेडिट स्कोअर कमी झाल्याचे कारण सांगून खाते ‘अनफ्रीज’ करण्यासाठी आणखी पैशांची मागणी केली. यामुळे फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.


