spot_img
spot_img
spot_img

पोलीस बनून वृद्धांची फसवणूक करणारा रेकॉर्डवरील इराणी आरोपी अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलीस असल्याचे भासवून वयोवृद्ध महिला व पुरुषांचे सोन्याचे दागिने बतावणी करून हातचलाखीने काढून घेणाऱ्या रेकॉर्डवरील इराणी आरोपीस गुन्हे शाखा, युनिट-२ पिंपरी चिंचवड यांनी अटक केली आहे. ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील अंबिवली येथील इराणी वस्ती परिसरातून करण्यात आली.

मागील काही दिवसांत शहरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. यातीलच एक प्रकार हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम २०४, ३१९(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले.

सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान तब्बल १०० ते १२० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपी अंबिवली (ठाणे) येथील इराणी वस्ती परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन दिवस वेशांतर करून सापळा रचला. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मोहम्मद सय्यद कंबर अली (वय ४०, रा. कासीम हैदर अली यांचे भाड्याचे घर, स्टार बेकरी जवळ, इराणी वस्ती, अंबिवली, ठाणे) याला १३ फेब्रुवारी २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले. अटक करताना नातेवाईकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असतानाही पोलिसांनी धाडसाने कारवाई पूर्ण केली.

तपासात आरोपीने हिंजवडी पोलीस ठाणे (गु.र.क्र. ८२/२०२६) तसेच देहुरोड पोलीस ठाणे (गु.र.क्र. २५७/२०२५) हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. सदर आरोपी हा सराईत असून त्याच्याविरुद्ध विविध राज्यांमध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

या कारवाईत गुन्हे शाखा, युनिट-२चे अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अधिक माहितीसाठी वपोनि अरविंद पवार, गुन्हे शाखा युनिट-२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!