शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी सामर्थ्य फाउंडेशन यांच्या वतीने ‘सारथी संसाधन मेळावा’चे आयोजन बालकल्याण संस्था येथे करण्यात आले. बौद्धिक दिव्यांग विशेष मुलांच्या सर्वांगीण विकास आणि पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचा हा उपक्रम पालकांसाठी मार्गदर्शक आणि दिलासादायक ठरला.
या संसाधन मेळाव्यात बालरोगतज्ञ, विशेष शिक्षक, व्यवसायोपचार तज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, नेत्रचिकित्सक, दंतचिकित्सक तसेच विविध क्षेत्रातील डॉक्टर्स व थेरपिस्ट अशा २५ पेक्षा अधिक तज्ञांनी सहभाग घेतला. याशिवाय शासकीय योजना, विशेष आधार कार्ड आदींबाबत मार्गदर्शनाची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली.
या मेळाव्यात एकूण १०६ बौद्धिक दिव्यांग मुलांनी सहभाग नोंदवला. आवश्यक त्या सर्व शासकीय सेवा व तज्ञांचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे सहभागी कुटुंबांमध्ये समाधान आणि दिलासा यांचे वातावरण पाहायला मिळाले.
या उपक्रमासाठी ICDS (एकात्मिक बाल विकास सेवा), District Early Intervention Centre, Maharashtra Institute of Mental Health, सप्तश्री फाउंडेशन तसेच बालकल्याण संस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर बच्चे (महामंत्री, पिंपरी-चिंचवड भाजपा), डॉ. अमनप्रीत कौर (बजाज CSR), मा. मनीषा बिरारीस (नोडल अधिकारी – CDPO), डॉ. प्रफुल कापसे (MIHM), डॉ. मीनाक्षी आणि डॉ. संध्या (DEIC) उपस्थित होते.
संस्थेच्या संस्थापिका डॉ. शिवानी पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. संस्थेचे व्यवस्थापक सौरभ शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले.
सामर्थ्य फाउंडेशनची संपूर्ण टीम, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे हा संसाधन मेळावा यशस्वीपणे पार पडला. बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी हा उपक्रम खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरला.


