शबनम न्यूज | प्रतिनिधी
बनावट स्टँप पेपर व खोटी नोटरी तयार करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. सिमांता कामिनी कुमार दास (वय ३२, मूळ राहणार पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
एप्रिल २०२५ दरम्यान (नक्की तारीख व वेळ माहित नाही) हिंजवडी परिसरातील ई-सुविधा इंडिया केंद्रात आरोपीने मूळ स्टँप पेपरच्या रंगीत छायांकित प्रती काढून त्यावर बनावट नोटरी तयार केली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीचे ओळखपत्र (आयडी), बँक खाते उघडणे, गॅस कनेक्शन तसेच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वापर करण्यात आला.
संबंधित व्यक्तींकडे राहण्याचा किंवा पत्त्याचा कोणताही अधिकृत पुरावा नसतानाही घरमालकाच्या नावाने बनावट नोटरी अॅग्रीमेंट व इतर शासकीय कागदपत्रे तयार करण्यात आली. सदर स्टँप व नोटरी खरे असल्याचे भासवून शासनाची तसेच १० नागरिकांची मिळून सुमारे २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.


