शबनम न्यूज | पुणे
काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ पर्यटक मृत्युमुखी पडले. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री पुण्यात आणण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर शहरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी रात्रीपासून शहरातील संवेदनशील भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी शहरातील घडामोडींवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाज माध्यमात प्रसारित होणारे संदेशावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. समाज माध्यमातून अफवा प्रसारित केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.