राज्यभर ‘मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान’ राबविण्याचा निर्धार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. विधानभवन येथील कार्यालयात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही शोकसभा पार पडली.
या बैठकीत राज्यभर ‘अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान’ राबविण्याचा एकमताने निर्धार करण्यात आला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हेच अजितदादा पवार यांचे ध्येय होते, ते पुढे नेण्यासाठी राज्याची संघटनात्मक पुनर्रचना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण अशा सहा विभागांमध्ये पक्षाची आखणी करून सामाजिक न्याय विभाग अधिक सक्रिय करण्यात येणार आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णा बनसोडे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असून वंचित, दुर्बल आणि मागासवर्गीय घटकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवणे ही काळाची गरज आहे. उपमुख्यमंत्री तसेच पक्षाच्या नेत्या सुनित्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष अधिक मजबुतीने उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शोकसभा बैठकीत सामाजिक न्यायाशी संबंधित विविध प्रश्न, आगामी संघटनात्मक कार्यक्रम, तसेच शासनाच्या सामाजिक न्याय विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. अजितदादा पवार यांच्या शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेवर पक्षाची पुढील वाटचाल सुरू ठेवण्यासाठी एकजूट राखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
बैठकीदरम्यान शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी आपल्या कार्यक्षेत्रातील समस्या, उपक्रम आणि संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष पातळीवर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येईल, असेही अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक, शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शोकसभेच्या शेवटी अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि आगामी काळात जिल्हा व तालुका स्तरावर बैठका, जनजागृती अभियान आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला.


