शबनम न्यूज | प्रतिनिधी
बस विक्रीच्या नावाखाली बनावट कागदपत्रे दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल ५१ लाख ४५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या आरोपी फरार आहेत.
ही घटना दि. १४ मार्च २०२३ ते दि. २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सेक्टर नं. १६, राजे शिवाजी नगर, चिखली, ता. हवेली, जि. पुणे येथे घडली.
रवींद्र विठ्ठल तानवडे (वय ५०, व्यवसाय – फॅब्रिकेशन, रा. टेलिफोन एक्सचेंजजवळ, प. सम्राट एजन्सी, वडगाव शेरी, पुणे) असे फिर्यादीचे नाव आहे. संजय नारायण पवार, सागर संजय पवार व सुवर्णा संजय पवार (सर्व रा. सेक्टर नं. १६, राजे शिवाजी नगर, चिखली) यांनी फिर्यादीस बस विक्रीस असल्याचे सांगितले.
आरोपींनी टी.एस.-०८, टी.एस.-१३, एम.एच.-१४ या क्रमांकाच्या बसेस स्वतःच्या मालकीच्या असल्याचे भासवून आरटीओची बनावट कागदपत्रे व खोटे शिक्के मारून फिर्यादीला दाखवले. या बदल्यात फिर्यादी व त्यांच्या पत्नी पायल तानवडे यांच्याकडून ५१,४५,००० रुपये आरटीजीएस, ऑनलाईन व रोख स्वरूपात (वचन चिठ्ठीद्वारे) घेतले.
मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपींनी सदर बसेस फिर्यादीस विकत दिल्या नाहीत तसेच घेतलेली रक्कम परत न करता फिर्यादीचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी आरोपींविरोधात भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३१८(२), ३१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.


