शबनम न्यूज | पुणे
नगर रस्त्यावरील चंदननगर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत बुधवारी पहाटे आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच रहिवासी बाहेर पळाल्याने गंभीर दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर १० गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घबराट उडाली. आगीत ५० पेक्षा जास्त झोपड्या जळाल्या असल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वसाहतीतील झोपड्यांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १५ बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्यानंतर वसाहतीतील नागरिक बाहेर पळाल्याने गंभीर दुर्घटना टळली. झोपड्यांमधील दहा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. स्फोटाच्या आवााजमुळे घबराट उडाली.
अग्निशमन दलाचे केंदप्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीत झोपड्यांमधील गृहोपयोगी वस्तू जळाल्या. डोळ्यादेखत संसार जळाल्याने अनेकांना दु:ख अनावर झाले.