शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याचे अपहरण व निर्घृण मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता केशवनगर येथील मराठी शाळेसमोर, काळेवाडी रोड, चिंचवड येथे घडली. आशितोष संतोष बराडे (वय २२, रा. चिंचवड) हा तरुण रस्त्याने जात असताना आरोपी विकी अनिल घोलप व शुभम विनायक चौधरी यांनी हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यानंतर फिर्यादीला जबरदस्तीने आरोपींच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून नेण्यात आले. कारमध्येच आरोपी विकी घोलप याने फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार केला, तर आरोपी आदित्य अशोक चव्हाण याने लोखंडी कड्याने डोक्यावर मारहाण केली.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला गवडे जलतरण तलाव, चिंचवडगाव येथे नेऊन, तेथे सातही आरोपींनी एकत्र संगनमत करून फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या प्रकरणी विकी अनिल घोलप, मयूर अनिल घोलप, शुभम विनायक चौधरी, आदित्य अशोक चव्हाण, मंगेश नंदकुमार सांगळे, प्रसाद उर्फ सोन्या मारुती सावळे आणि समीर कोंडीराम भोईर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी आरोपी क्रमांक २, ५, ६ व ७ यांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.


