निगडी पोलिसांकडून चार जणांविरोधात गुन्हा दाखल; तिघे ताब्यात
शबनम न्यूज | प्रतिनिधी
आकुर्डी येथील विठ्ठलवाडी परिसरात भरदिवसा झालेल्या कोयता हल्ल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते ९.४५ वाजण्याच्या सुमारास रामदेव हॉटेलजवळ जुन्या वादातून चौघा तरुणांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
या प्रकरणी अक्षय शंकर थिटे (वय ३२, व्यवसाय – खाजगी नोकरी, रा. रोलिंग हिल्स सोसायटी, साईनगर, मामुर्डी, देहुरोड, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी सुदर्शन संतोष चव्हाण (वय २१), गौरव काळे (वय २०) आणि आर्यन उर्फ वाट्या सावंत (वय २१) यांनी फिर्यादी अक्षय थिटे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी आदित्य सुरेंद्र यादव (वय २५, रा. गुरुदेवनगर, आकुर्डी) याने शर्टमध्ये लपवलेला लोखंडी कोयता बाहेर काढून “तुला आता सोडणार नाही, ठार मारतो” अशी धमकी देत फिर्यादीच्या डोक्यावर, डाव्या कानाच्या मागे वार करून गंभीर जखमी केले.
हल्ल्यानंतर आरोपी आदित्य यादव याने हातातील कोयता हवेत फिरवत, “माझ्यावर हाफ मर्डरचे तीन गुन्हे आहेत, माझ्यावर मोक्का लागलेला आहे, मला कोणीही काही करू शकत नाही, मी इथला भाई आहे,” असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटीही करण्यात आली.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५१(३), ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), २७, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३, ७, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी सुदर्शन चव्हाण, गौरव काळे आणि आर्यन उर्फ वाट्या सावंत हे पोलीस ताब्यात असून आरोपी आदित्य यादव याचा शोध सुरू आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.


