शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत परीक्षाकाळात कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य बोर्डाच्या वेळापत्रकानुसार दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून इयत्ता १२ वीची, तर २० फेब्रुवारी २०२६ पासून इयत्ता १० वीची बोर्ड परीक्षा सुरू होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात इयत्ता १० वीची परीक्षा एकूण ७३ केंद्रांवर, तर इयत्ता १२ वीची परीक्षा ४२ केंद्रांवर होणार आहे. परीक्षा पारदर्शक, शांततापूर्ण व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे.
परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, सार्वजनिक टेलिफोन, झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे, फॅक्स, एस.टी.डी. तसेच ध्वनीक्षेपक व तत्सम दुरसंचार साधने परीक्षाकाळात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्रांमध्ये मोबाईल फोन, ब्लूटूथ, पेजर, इंटरनेट माध्यमे यांसह कोणत्याही प्रकारच्या दुरसंचार साधनांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी मनाई आदेश जारी केला असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अंतर्गत कारवाई होणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवले जाणार आहेत. तसेच ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्रांची निगराणी व आवश्यकतेनुसार व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, परीक्षेत गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे किंवा प्रत्यक्ष कॉपी करताना आढळून येणाऱ्यांवर Maharashtra Prevention of Malpractices Act, 1982 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


