शबनम न्यूज | प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध , सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग व विद्यार्थी मंच आयोजित कर्मवीर करंडक आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धा दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.हे या स्पर्धेचे सहावे वर्ष आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.दुर्गेश काळे व प्रमुख उपस्थिती मा. प्राचार्य संजय नगरकर- दादा पाटील महाविद्यालय,कर्जत हे उपस्थित राहणार आहे.
पथनाट्य हे रस्त्यावर किंवा चौकाचौकांत चालत असले तरी पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही; विशिष्ट सामाजिक विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात. ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. आर्थिक-सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, नोकरशाहीची चालढकलवृत्ती, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा प्रश्न इत्यादी अनेक विषयांवर ही पथनाट्ये भाष्य करून रस्त्यावरील प्रेक्षकांमध्ये जागृतीचे काम करीत असतात. पथनाट्याच्या कलावंतांना उंच स्वरात बोलावे लागते. त्यांचा सारा भर अभिनयापेक्षा प्रेक्षकांना प्रश्नाची जाणीव करून देण्यात असतो अशा पथनाट्याच्या स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध या ठिकाणी आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ‘पाटलीनबाई’ फेम मा. तनुश्री पुणेकर, दिग्दर्शक, मनीष शिंदे, ‘चाकर शिवबाचे’ फेम सिध्दार्थ मानुरकर, अजय भुरके महाराज असणार आहेत.
तरी या पथनाट्य स्पर्धेसाठी जास्त संख्येने उपस्थित राहून ही पथनाट्य स्पर्धा यशस्वी करावी. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी केले आहे.


