शबनम न्यूज | प्रतिनिधी
तळवडे व दिघी औद्योगिक परिसरातील वाढत्या वीज मागणीमुळे निर्माण होणाऱ्या वारंवार बिघाड व सक्तीच्या भारनियमनाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महावितरणकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. औद्योगिक व आय.टी. क्षेत्राच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन 22/22 के.व्ही. कॅनबे उपकेंद्र तसेच 22/11 के.व्ही. GREF सेंटर कळस येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारणीचे DPR प्रस्तावित करण्यात आले आहेत. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी याबाबत केलेल्या सातत्त्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
सध्या तळवडे परिसरातील विद्युत यंत्रणा अतिभारित व संयुक्त स्वरूपाची असल्यामुळे वारंवार ब्रेकडाऊन होत असून प्रमुख औद्योगिक व आय.टी. परिसरांचा वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर महसूल नुकसान व ग्राहकांमध्ये नाराजी आहे. याबाबत महावितरण संदर्भात विविध प्रलंबित विकास कामांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे संचालक विश्वास पाठक यांच्यासोबत मे-2025 मध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. तसेच, विधानसभा अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी केली होती. त्याला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
तसेच, 22/11 के.व्ही. GREF सेंटर कळस उपकेंद्रातील 10 MVA क्षमतेचा एकमेव ट्रान्सफॉर्मर सध्या जवळपास 95 टक्के भारावर कार्यरत आहे. परिणामी उच्चांक मागणी दरम्यान दिघी व VSNL फीडरवर दररोज 2 ते 3 तास सक्तीचे भारनियमन करावे लागत आहे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी GREF सेंटर कळस येथे अतिरिक्त 10 MVA पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारण्याचा DPR प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे दिघी परिसरातील औद्योगिक व निवासी ग्राहकांना अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.
औद्योगिक विकासाला चालना
कॅनबे आणि कळस येथील दोन्ही प्रकल्पांमुळे तळवडे–दिघी औद्योगिक पट्ट्यातील वीज व्यवस्था अधिक सक्षम होऊन नवीन उद्योग, आय.टी. पार्क व गुंतवणुकीस चालना मिळणार आहे. तसेच वारंवार होणारे बिघाड, भारनियमन व महसूल नुकसान लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तळवडे परिसरातील विद्यमान पायाभूत सुविधा त्यांच्या कमाल क्षमतेवर कार्यरत असून भविष्यातील औद्योगिक भारवाढ लक्षात घेता 22/22 के.व्ही. कॅनबे उपकेंद्राची उभारणी अत्यावश्यक ठरली आहे. या उपकेंद्रामुळे औद्योगिक ग्राहकांना विश्वासार्ह, सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.
“तळवडे व दिघी परिसरातील औद्योगिक, आय.टी. तसेच स्थानिक नागरिकांना सातत्यपूर्ण, दर्जेदार आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून कॅनबे उपकेंद्र व GREF सेंटर कळस येथे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उभारणीचा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढत्या औद्योगिक भारामुळे निर्माण झालेल्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल. या कामांसाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय मंजुरी व पाठपुराव्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असून, पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही,”
— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.


