शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देवाश्री मुखर्जी यांनी पुणे दौऱ्यादरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती व महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना भेट दिली व माहिती घेतली.
या भेटीदरम्यान कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त अमित सैनी, महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, प्रादेशिक संचालक चेंगोटी मूर्ती यांच्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, समाज विकास विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,प्रशासन अधिकारी अनिता बाविस्कर तसेच स्वयंसेवी महिला बचत गटातील महिला आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग व लाईटहाऊस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या निगडी येथील ‘कौशल्यम’ (लाईटहाऊस) प्रकल्पास अधिकाऱ्यांनी भेट दिली. या केंद्रामध्ये तरुण व महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती घेण्यात आली. यावेळी प्रशिक्षणार्थी युवक व महिलांशी संवाद साधत त्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी, कौशल्यविकासाची दिशा व आत्मविश्वास वृद्धीबाबत अनुभव जाणून घेतले.
प्रशिक्षणार्थींनी या प्रकल्पामुळे उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण मिळाल्याने नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. विशेषतः विवाहानंतर करिअरमध्ये आलेल्या अडचणींवर मात करून पुन्हा व्यावसायिक जीवनात प्रवेश करण्यासाठी या प्रकल्पाने मोठी प्रेरणा दिल्याचे महिलांनी नमूद केले. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींच्या प्रगतीचे कौतुक करत कौशल्याधारित रोजगार निर्मितीच्या दृष्टीने हा प्रकल्प प्रभावी ठरत असल्याचे मत व्यक्त केले.
यानंतर शिष्टमंडळाने आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील महिला बचत गटांमार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘सखी आंगण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास भेट दिली. ४९ गाळ्यांच्या या संकुलामध्ये महिला बचत गटांकडून फूड व नॉन-फूड अशा दोन प्रवर्गांत विविध उत्पादनांची निर्मिती, प्रक्रिया, पॅकेजिंग व थेट विक्री केली जाते. या ठिकाणी नाश्ता व जेवणाचे खाद्यपदार्थ, पापड, लोणची, मसाले, तयार खाद्यपदार्थ, बेकरी उत्पादने, हस्तकला साहित्य, सजावटीच्या वस्तू, कापडी पिशव्या, अगरबत्ती तसेच सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित वस्तूंची विक्री करण्यात येते.
महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सखी आंगण प्रकल्पामुळे महिला बचत गटांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत असून मध्यस्थांची साखळी टळल्याने महिलांना अधिक आर्थिक लाभ होत आहे. केवळ विक्रीपुरते मर्यादित न राहता आर्थिक व्यवहार, विपणन, ग्राहक संवाद व व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण महिलांना या प्रकल्पातून मिळत असल्याने अनेक महिला रोजगार देणाऱ्या उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. त्यामुळे ‘सखी आंगण’ हा प्रकल्प महिला सक्षमीकरणाचे आदर्श मॉडेल ठरत असल्याचे मत यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे ‘कौशल्यम’ आणि ‘सखी आंगण’ हे उपक्रम केवळ प्रशिक्षण किंवा विक्रीपुरते मर्यादित नसून, रोजगारनिर्मिती व महिला उद्योजकता घडविणारे प्रभावी मॉडेल ठरत आहेत. उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य विकास, थेट बाजारपेठेपर्यंत पोहोच आणि आर्थिक स्वावलंबन यांचा एकत्रित विचार करून हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने अशा उपक्रमांचा विस्तार करून अधिकाधिक युवक व महिलांना सक्षम करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.
-श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


