spot_img
spot_img
spot_img

गुलकंदचे, हास्यजत्रा टीमसोबत दिलखुलास संवाद,दिशा सोशल फाऊंडेशनचा २८ एप्रिलला कार्यक्रम

समीर चौघुले, सई ताम्हणकर, मोटे, गोस्वामींची उपस्थिती

पिंपरी, पुणे (दि. २१ एप्रिल २०२५) महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील मराठी माणसाच्या घराघरात, मनामनात अढळ स्थान मिळवलेल्या `महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेच्या टीमसोबत दिलखुलास संवाद साधण्याचा कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनने २८ एप्रिलला चिंचवड येथे आयोजित केला आहे. निमित्त आहे, आगामी ‘गुलकंद’ या सिनेमाचे.
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये बहुचर्चित ठरलेला ‘गुलकंद’ हा सिनेमा १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याचे औचित्य साधून या सिनेमातील दिग्गजांशी संवाद साधत खुमारदार किस्से आणि गप्पांचा रंगतदार कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनने आयोजित केला आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सोमवारी, २८ एप्रिल, सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अभिनेते समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा वडनेरकर, लेखक सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असून प्रथम येईल, त्यास प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संतोष बाबर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
हास्यजत्रेच्या यशानंतर गुलकंदची निर्मिती
गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा ही सोनी मराठीवरील मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आतापर्यंत जवळपास ९०० भाग प्रसारित झाले आहेत. विनोदनिर्मितीचे कुलगुरू म्हणून ख्याती असणारे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या वेटक्लाऊड प्रॉडक्शनच्या वतीने या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. हास्यजत्रेच्या तुफान यशानंतर याच वेटक्लाऊडने निर्मिती केलेला ‘गुलकंद’ हा पहिलाच चित्रपट आहे. कौटुंबिक, विनोदी प्रकारातील या चित्रपटाचा नायक म्हणून समीर चौघुले यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. सई ताम्हणकर ही समीरच्या नायिकेच्या भूमिकेत आहे, हे गुलकंदचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय, प्रसाद ओक, ईशा वडनेरकर, वनिता खरात, तेजस राऊत, जुई भागवत यांच्यासह मोटे आणि गोस्वामी यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!