शबनम न्यूज | प्रतिनिधी
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत पिंपरी प्रभाग क्रमांक २१मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वाघेरे यांनी पॅनलची जबाबदारी समर्थपणे पेलून भाजपचा अक्षरशः सुपडा साफ करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू केले होते. यामध्ये संदीप वाघेरे यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या संजोग वाघेरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची चर्चा सुरू होती. या प्रवेशाला संदीप वाघेरे यांनी जोरदार विरोध केला. मात्र भाजपने संदीप वाघेरे यांना हलक्यात घेऊन संजोग वाघेरे यांना प्रवेश दिला. त्यानंतर संदीप वाघेरे यांनीही आक्रमक भूमिका घेत भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संदीप वाघेरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या खांद्यावर संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली. अजितदादांच्या विश्वासाला सार्थ ठरवत संदीप वाघेरे यांनी संपूर्ण पॅनल निवडून आणत दणदणीत विजय मिळवला. स्वतः संदीप यांनी भाजपच्या गणेश ढाकणे यांचा तब्बल १६ हजार ४३० मतांच्या भरघोस मताधिक्याने पराभव करत त्यांचे डिपॉझिट जप्त केले. या विजयामुळे संदीप वाघेरे हे केवळ विजयी उमेदवार न राहता, या प्रभागातील ‘किंगमेकर’ ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत पिंपरीतील चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा गजर होत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली. त्यामुळे संदीप वाघेरे यांच्यासारखा मोहरा हातातून घालवण्याची चूक भाजपला चांगलीच महागात पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
संदीप वाघेरे यांनी प्रचारात स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत नागरिकांशी थेट संवाद साधला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, युवक व महिलांचे प्रश्न यावर त्यांनी ठोस भूमिका मांडली. ‘ना जात, ना धर्म – विकास हा एकमेव अजेंडा’ या भूमिकेमुळे सर्व समाजघटकांचा विश्वास त्यांनी संपादन केला. याचाच परिपाक म्हणून मतदारांनी भरभरून कौल दिला.
या विजयामुळे संदीप वाघेरे यांचे पिंपरीतील राजकीय वजन लक्षणीयरीत्या वाढले असून, महापालिकेतही पक्षाच्या निर्णयामध्ये संदीप वाघेरे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपसाठी हा पराभव आत्मपरीक्षण करण्याची वेळ असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पिंपरीत पुन्हा एकदा घड्याळाचा ठसा अधिक ठळकपणे उमटल्याचे चित्र दिसून येत आहे.


