शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचाराच्या या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या प्रचारार्थ संदीप काटे यांनी प्रभागातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची व सदस्यांची बैठक घेऊन थेट संवाद साधला.
या बैठकीदरम्यान सोसायटी धारकांनी पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची दुरवस्था, पार्किंगची समस्या, कचरा संकलन, स्वच्छता, सार्वजनिक सुरक्षा, स्ट्रीट लाईट्स तसेच मुलांसाठी खेळाची मैदाने आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अशा अनेक महत्त्वाच्या समस्या मांडल्या. या सर्व प्रश्नांची सविस्तर नोंद घेत संदीप काटे यांनी निवडणुकीनंतर प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी अनिताताई संदीप काटे यांना सोसायटी धारकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. “आमचा पाठिंबा नेहमी अनिताताई यांच्या पाठीशी आहे. त्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच सक्षम नेतृत्व देतील,” अशी भावना सोसायटी धारकांनी व्यक्त केली.
अनिताताई काटे या शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या, सुधारणावादी विचारसरणीच्या आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणाऱ्या नेत्या असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांसाठी सुरक्षितता, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, आरोग्यसेवा आणि स्वच्छ, नियोजनबद्ध विकास यावर त्यांचा विशेष भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यंदा प्रभाग क्रमांक २८ मधून अनिताताई काटे यांनाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, असा ठाम विश्वास सोसायटी धारकांनी व्यक्त केला असून, या पाठिंब्यामुळे भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत, वाढता जनसमर्थन आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपची बाजू अधिक मजबूत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


