पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘विजय संकल्प सभा’ प्रचंड उत्साहात पार पडली. नागरिक, महिला, युवक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी सभास्थळी मोठी गर्दी केली होती. अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले.
या सभेला प्रभाग क्रमांक 5 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रियांका ताई प्रवीण बारसे, भिमाबाई फुगे, अमर फुगे आणि राहुल गवळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते व विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना भरभरून मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. “हे चारही उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि प्रामाणिक असून नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे आहेत,” असे ते म्हणाले.
सभेत बोलताना अजित पवार यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. “आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवडची आज अवस्था दयनीय झाली आहे. ज्यांच्या हाती तुम्ही शहराची सूत्रे दिली, त्यांनी ती नीट सांभाळली नाहीत. टँकर माफिया, दहशत, दादागिरी, हफ्तेवसुली, कोयता गँग यामुळे सामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाला आहे. शहरात गुंडगिरी वाढली असून तरुण पिढी वाया जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
अजित पवार पुढे म्हणाले, “आमच्या काळात आम्ही मोठी विकासकामे केली. अनेक प्रश्न सोडवले; पण कधीही महानगरपालिकेला कर्जबाजारी केले नाही. उलट ठेवी वाढवल्या. भोसरीचा पूल चार पदरी केला, सक्षम आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामे केली. आज मात्र नियमित पाणीपुरवठा नाही, वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे, घंटागाडी बंद आहे, स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे.”
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवरही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. “नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत आहेत; पण कुत्रा नसबंदीच्या नावाखाली फक्त पैसे खाण्याचे काम झाले. महिलांवर अन्याय करणारे फतवे निघतात, झाडांची मोजणी न करताच कोट्यवधी रुपयांची बिले काढली जातात. हे पैसे कुठून येतात आणि कुठे जातात, हा प्रश्न जनतेला पडलेला आहे,” असे त्यांनी सांगितले.
निविदांमधील टक्केवारीच्या गैरप्रकारांवरही अजित पवार यांनी बोट ठेवले. “जास्त टक्केवारीने निविदा काढून केवळ मलिदा खाण्यासाठी विकासकामे सुरू आहेत. विकासाच्या नावाखाली तिजोरी भरण्याचे उद्योग सुरू असल्यामुळे महानगरपालिका कर्जबाजारी झाली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमक्यांचे फोन येतात; मात्र आम्ही दबावाला घाबरणारे नाही. हा भ्रष्टाचारी राक्षस संपवण्याचा आणि या राक्षसी व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा लढा आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सभेमुळे प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अजित पवार यांच्या आक्रमक भाषणामुळे उपस्थित नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद उमटला. सभेअंती “राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो” अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला.
या विजय संकल्प सभेमुळे प्रभाग क्रमांक पाचमधील राजकीय समीकरणे अधिकच स्पष्ट होत असून येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


