शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी गावात आयोजित गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत मंडळांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.’गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून पिंपरी गावचा विकास अक्षरशः कोंडला होता. गेल्या पाच वर्षात विकासाची जी कामे करता येण्यासारखी होती ती केलीच त्याबरोबर जी कामे होऊ शकत नव्हती तीही मार्गी लावली. अजून खूप करायचे आहे . पिंपरी गावचा कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करा.’ असे आवाहन यावेळी प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे यांनी केले.
पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे निकिता कदम यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीस गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला गणेश मंडळाच्या वतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना संदीप वाघेरे यांनी सन 2017 मध्ये महापालिकेवर निवड झाल्यापासून केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. मिलिटरी डेअरी फार्म येथे करण्यात आलेले 6000 वृक्षांचे रोपण, डेरी फार्म उड्डाणपुलाचा मार्गी लावलेला प्रश्न, पवना सुधारसाठी केलेली धडपड, पूर्णत्वास नेलेले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचे नूतनीकरण, पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे रुंदीकरण, कोरोना काळात जिजामाता रुग्णालयासाठी दिलेली वैद्यकीय उपकरणांची मदत याचा उल्लेख त्यांनी केला.
आपण पस्तीस चाळीस वर्षे पिंपरी गाव आहे असेच पाहत आलो. सन 2017 च्या महापालिका निवडणुकीत आपण माझ्या रूपाने योग्य व्यक्तीला निवडून दिले. आपल्या विश्वासात पात्र होण्याचा प्रयत्न केला आहे. आणखीही खूप काही करायचे आहे त्यासाठी माझ्यासह डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन वाघेरे यांनी केले.


