प्रभाग क्रमांक २२ मध्ये प्रचाराला वेग; चर्चमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील अधिकृत उमेदवार सायली नढे यांच्या प्रचाराला वेग आला असून विविध समाजघटकांचा त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. आज ख्रिश्चन समुदायाने सायली नढे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या प्रचाराला बळ दिले.
सायली नढे यांनी आज चर्चमध्ये जाऊन ख्रिश्चन बांधवांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाबाबतच्या सूचना जाणून घेतल्या. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सुविधा, तसेच युवक व महिलांसाठी आवश्यक उपक्रम याबाबत ख्रिश्चन समुदायातील नागरिकांनी आपली मते मांडली. यावेळी माजी नगरसेवक बाबू नायर उपस्थित होते.

यावेळी सायली नढे यांनी सर्व समस्या लक्षपूर्वक ऐकून घेत निवडणुकीनंतर त्यावर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. “प्रभागातील प्रत्येक समाजघटकाला सोबत घेऊन समतोल व सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चर्चमध्ये उपस्थित नागरिकांना सायली नढे यांनी येत्या मतदानाच्या दिवशी मतदान कसे करावे, ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाची प्रक्रिया काय आहे, याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.
ख्रिश्चन समुदायातील मान्यवरांनी सायली नढे यांच्या विचारसरणीवर आणि विकासाभिमुख भूमिकेवर विश्वास व्यक्त करत त्यांना निवडणुकीत पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. एकूणच प्रभाग क्रमांक २२ मध्ये सायली नढे यांच्या प्रचारामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विविध समाजघटकांचा मिळणारा पाठिंबा त्यांच्या विजयाच्या दिशेने आशादायक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


