शबनम न्यूज | प्रतिनिधी
लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे, १५ जानेवारी रोजी राज्य शासनाने निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्या दिवशी सर्वप्रथम शहरातील सर्व मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, आपले मतदान ही आपली जबाबदारी असून आपल्या कर्तव्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी आयोजित व्हिंटेज कार रॅली लिनिअर गार्डन (कोकण चौक), पिंपळे सौदागर ते नियोजित महापौर निवास मैदान, निगडी येथे पार पडली. या रॅलीचे उद्घाटन निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मतदार जनजागृतीसाठीच्या ब्रॅंड ॲम्बेसिडर प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच क्लासिक कार क्लबचे अध्यक्ष अनंत भुकेले पाटील उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत उप आयुक्त अण्णा बोदडे व त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे. मतदार जनजागृतीसाठी महापालिकेकडून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. जागरूक मतदारांनी कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही बळकट करावी.
पिंपरी चिंचवडमधील नागरिक अत्यंत जागरूक व सुज्ञ असून त्यांना त्यांच्या हक्क व कर्तव्यांची पूर्णतः जाणीव आहे. त्यामुळे १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील, असा विश्वास मतदार जनजागृतीसाठीच्या ब्रॅंड ॲंबेसेडर व प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी व्यक्त केला.
जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ दिली.
अनोख्या व्हिंटेज कार्स व दुचाकी :
१९३५ पासूनच्या विविध प्रकारच्या आकर्षक गाड्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये फोर्ड, १९५० ते २००० मधील मिली सिटॉप, मर्सिडिज,प्रिमियर पद्मिनी,११८ एन.ई.,सिलेक्ट, प्रेसिडेंट तसेच दुसऱ्या महायुद्धातील जीप तसेच लॅब्रेटा,विजया सुपर, राजदूत, येझदी,व्हेस्पा,बजाज सुपर अशा दुचाकींसह आदी गाड्यांचाही समावेश होता. फियाट क्लासिक कार क्लबचे अध्यक्ष अनंत भुकेले पाटील यांनी यावेळी उपस्थितांना विविध गाड्यांची सविस्तर माहिती दिली.
फ्लॅश मॉबच्या माध्यमातून जनजागृती
यावेळी मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी फ्लॅश मॉब सादर करण्यात आला. उत्साही कलाकारांनी नृत्य, अभिनय आणि घोषणांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व, मतदाराचा अधिकार व कर्तव्य याबाबत प्रभावी संदेश दिला. “माझे मत – माझा अधिकार”, “लोकशाही बळकट करूया, मतदान करूया” अशा घोषवाक्यांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी उपस्थित शेकडो नागरिकांनी निर्भयपणे तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेत १००% मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.


