गवळीनगरमध्ये सोसायटीधारकांसोबत बैठक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रियांका ताई प्रवीण बारसे या गवळीनगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाल्या असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छ, सुरक्षित व सुविधांनी युक्त प्रभाग उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गवळीनगर परिसरातील सोसायटीधारकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रियांका ताई बारसे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची दुरवस्था, पार्किंगचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाइट्स, उद्यानांचे सुशोभीकरण तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील मुद्दे नागरिकांनी मांडले.

बैठकीदरम्यान प्रियांका ताई बारसे यांनी, “प्रभाग क्रमांक ५ चा सर्वांगीण व संतुलित विकास करणे हेच माझे ध्येय आहे. मूलभूत सुविधा सक्षम करणे, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करणे आणि पारदर्शक कारभार राबवणे यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन,” असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी त्यांनी तरुणांसाठी क्रीडा सुविधा, उद्याने व ओपन जिमचे सुदृढीकरण, महिलांसाठी स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, तसेच स्वच्छता आणि हरित प्रभाग संकल्पना राबविण्याचा संकल्प जाहीर केला. डिजिटल तक्रार निवारण, नियमित प्रभागस्तरीय बैठकांद्वारे नागरिकांशी संवाद ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
बैठकीस उपस्थित सोसायटीधारक व नागरिकांनी प्रियांका ताई बारसे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत त्यांना भक्कम पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. अखेरीस, येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ च्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला संधी देण्याचे आवाहन प्रियांका ताई बारसे यांनी नागरिकांना केले.



