शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रियांकाताई बारसे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. आज सकाळी त्यांनी गवळीनगर येथील सखुबाई गवळी उद्यानात भेट देत व्यायामप्रेमी नागरिक व ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधला. सकाळच्या रम्य वातावरणात झालेल्या या गाठीभेटींमुळे प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
यावेळी उद्यानातील नागरिकांनी परिसरातील विविध समस्या प्रियांकाताई बारसे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. उद्यानातील स्वच्छतेचा अभाव, अपुरी प्रकाशव्यवस्था, ओपन जिममधील काही व्यायाम साहित्याची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची अडचण, तसेच देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न नागरिकांनी मांडला. ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत बसण्यासाठी अधिक बाके, चालण्यासाठी सुयोग्य पायवाट तसेच नियमित देखरेखीची मागणी केली.

नागरिकांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घेत प्रियांका ताई बारसे यांनी, निवडणुकीनंतर या प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडविण्याचे आश्वासन दिले. “नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सोडविणे हेच माझे पहिले प्राधान्य असेल. उद्यानांचे सुशोभीकरण, ओपन जिमची दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षितता यासाठी विशेष प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रियांकाताई बारसे यांनी येत्या मतदानाच्या दिवशी सर्वांनी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएमद्वारे मतदान कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सकाळच्या भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांनी प्रियांकाताई बारसे यांच्या कामाच्या धडाडीवर विश्वास व्यक्त करत त्यांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. प्रचाराच्या या जनसंवादात्मक पद्धतीमुळे प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


