उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या महिला पदयात्रेने संपूर्ण परिसरात उत्साहाची लाट निर्माण केली. घोषणांनी, फुलांच्या उधळणीने आणि महिलांच्या प्रचंड सहभागामुळे ही पदयात्रा प्रचारातील शक्तिप्रदर्शन ठरली.
या प्रभागातून अ प्रवर्गातून विराज विश्वनाथ लांडे, ब प्रवर्गातून अनुराधा सुशिल लांडगे, क प्रवर्गातून अश्विनी निलेश फुगे आणि ड प्रवर्गातून अमोल मधुकर डोळस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असून, त्यांच्या विजयासाठी ही जोशपूर्ण पदयात्रा काढण्यात आली. माजी महापौर मोहिनी लांडे, संगिता लांडे, कांचन लांडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मंगला गवळी, वैशाली शिंदे, प्रतिभा बिराजदार, गंगुबाई चौगुले, सुनिला लांडगे, रोहिणी, विद्या दळवी, वर्षा कवितके, सुरेखा पंडित आदीसह महिला, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
लांडेवाडी, आदिनाथनगर, डोळसवाडा, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, जेपी नगर, फुगे-माने तालीम परिसर, दिघी रोड, गव्हाणे तालीम परिसर या संपूर्ण भागातून रॅली जात असताना ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून, पुष्पवृष्टी करत उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. राष्ट्रवादीच्या घोषणा, ढोल-ताशांचा गजर आणि महिला शक्तीचा बुलंद आवाज यामुळे परिसर दणाणून गेला.
या दरम्यान महिलांना पक्षाचा जाहिरनामा वाटप करण्यात आला. विकास, महिला सक्षमीकरण, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर उमेदवारांनी आपली ठाम भूमिका मांडली. प्रभागाच्या विकासासाठी बदल का करणे अपेक्षित आहे या बाबत आपली भूमिका मांडली. त्यासाठी रणरागिणींनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.“प्रभागाच्या विकासासाठी आम्ही एकदिलाने लढणार,” असा विश्वास महिलांनी व्यक्त करत उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही दिली. या जोशपूर्ण महिला पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला नवी धार मिळाली असून, आगामी निवडणुकीत महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


