पिंपरी–चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील युतीचे उमेदवार विश्वजीत श्रीरंग बारणे, रूपाली लालासाहेब गुजर, मायाताई संतोष बारणे व निलेश हिरामण बारणे यांना पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली (भारत) यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
पोलीस मित्र संघटनेच्या पिंपरी–चिंचवड शहर जिल्हा कमिटीच्या वतीने एकमताने हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे अधिकृत पाठिंबा पत्रही जाहीर करण्यात आले आहे. या पाठिंबा पत्रात संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संभाजी बारणे तसेच पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अमीना पटेल यांच्या उपस्थितीत व जिल्हा कमिटीच्या वतीने उमेदवारांना पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक २४ च्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीचे उमेदवार सक्षम असून त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवता येतील, असा विश्वास पोलीस मित्र संघटनेने व्यक्त केला आहे. या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक २४ मधील युतीची ताकद अधिक बळकट होणार असून प्रचारादरम्यान याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


