पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी): राजकारणात मी नवी असले तरी मला मजबूत असा कौटुंबिक राजकीय वारसा लाभला आहे. माझे आजोबा चंद्रकांत टिळेकर हे देहूचे सरपंच होते, तर सासरे रंगनाथशेठ कुदळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रभावी काम केले आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका कुदळे यांनी केले.
प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांच्या पॅनलने प्रचाराला जोरदार गती दिली आहे. वैयक्तिक भेटीगाठी, घरोघरी संपर्क आणि प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यात आला असून पिंपरी गाव व पिंपरी कॅम्प परिसरात सर्व स्तरांतील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विशेष म्हणजे, या पॅनलला मुस्लिम व मारवाडी समाजाचा मोठा आणि ठाम पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रचारादरम्यान विविध समाजबांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केल्याने वातावरण अधिक अनुकूल झाले आहे.
या प्रचार रॅलीमध्ये पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून पॅनलच्या विजयासाठी एकजूट दाखवली.
यावेळी बोलताना संदीप वाघेरे म्हणाले, “महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना प्रभागातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासकामे केली. त्या कामांची पोचपावती म्हणजे आज सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा. प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मी मतदारांना करतो.”
प्रभागात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा त्यांनी मतदारांसमोर मांडत पुढील काळात अधिक गतिमान आणि सर्वसमावेशक विकासाचा निर्धार व्यक्त केला.


