प्रभाग १९ मध्ये ‘विश्वासाचा चेहरा’ म्हणून आकाश चतुर्वेदी मैदानात
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आकाश पंकज चतुर्वेदी निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांच्या प्रचाराला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना दिसत आहे. संपूर्ण प्रभागात परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून, “आकाश चतुर्वेदी म्हणजे केवळ उमेदवार नव्हे, तर प्रभागाचा विश्वास” अशी भावना नागरिकांमध्ये ठळकपणे उमटत आहे.
आकाश चतुर्वेदी हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक १९ मध्ये जनसेवक म्हणून सक्रिय आहेत. सामाजिक बांधिलकी आणि सततच्या कार्यातून त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. वंचित व गरजू घटकांसाठी राबवलेले आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिलांसाठीचे उपक्रम, तसेच कोविड काळात केलेली अतुलनीय मदत आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. कोविडच्या कठीण काळात अनेकांना वेळेवर उपचार, औषधे, आरोग्य सुविधा आणि दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देत त्यांनी खऱ्या अर्थाने ‘माणुसकीचा हात’ पुढे केला. त्यांच्या या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचले, हेच त्यांच्या कामाचे सर्वात मोठे प्रमाणपत्र आहे.
प्रचारादरम्यान प्रभागातील प्रत्येक भागात नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी, गल्लीबोळांत आणि चौकाचौकांत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.
मतदारांशी संवाद साधताना आकाश चतुर्वेदी यांनी भावनिक आवाहन करत सांगितले की, “मी आणि माझे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहोत. धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या प्रभागात नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळावी, हे मी माझे भाग्य समजतो.”
सुकन्या योजना, लाडकी बहीण योजना, महिला व बालकल्याण योजना, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी अर्थसहाय्य, आधार कार्ड मिळवून देणे, महाआरोग्य शिबिरे, धार्मिक उपक्रम, तसेच क्रीडापटूंना प्रोत्साहन व पुरस्कार—अशा विविध कल्याणकारी योजना त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने यशस्वीरित्या राबवल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि विकासाच्या प्रलंबित प्रश्नांचा अनुभव घेऊनच आपण या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे सांगत, “प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा निर्धार आहे” असा ठाम विश्वास आकाश चतुर्वेदी यांनी व्यक्त केला. एकूणच प्रभाग क्रमांक १९ मध्ये परिवर्तनाची चाहूल लागली असून, निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भक्कम पाठिंबा मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


