पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मोहननगर येथील भव्य जाहीर सभेतून भाजपाच्या विजयाचा ठाम एल्गार केला. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि घोषणांच्या गजराने संपूर्ण परिसर भगवामय झाला.

या सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनतेशी थेट संवाद हीच भाजपाची खरी ताकद आहे. “भ्रष्टाचाराला थारा नाही, दडपशाहीला माफी नाही आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाला अजिबात स्थान नाही,” असा ठाम इशारा देत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजपाच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, महापालिकेतील सत्ता म्हणजे सेवा असते, सौदेबाजी नव्हे. त्यामुळेच पुन्हा एकदा जनतेचा कौल भाजपाच्याच बाजूने येणार असून, विजय आता अटळ आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सभेतून प्रभाग क्रमांक १४ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार मिनल यादव, ऐश्वर्या बाबर, कैलास कुटे आणि प्रसाद शेट्टी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले, असा ठाम सूर उपस्थितांमध्ये होता. “या चौघांचाही विजय १०० टक्के निश्चित आहे,” असे जाहीर करत भक्कम संघटन, प्रचंड जनसमर्थन आणि सक्षम नेतृत्वाच्या जोरावर भाजप प्रभाग १४ मध्ये इतिहास घडवणार, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सभेला उस्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी आणि जोशपूर्ण कार्यकर्त्यांनी हे स्पष्ट केले की मोहननगरच नव्हे, तर संपूर्ण प्रभाग १४ मध्ये परिवर्तनाची लाट उसळली आहे. वार्डच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले भाजपाचे उमेदवार जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असा ठाम संदेश या सभेतून देण्यात आला.
या भव्य सभेमुळे निवडणूक रणांगणात भाजपाने निर्णायक आघाडी घेतली असून, विरोधकांची धडधड वाढली आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



