spot_img
spot_img
spot_img

‘संगीत परमेश्वरापर्यंत नेते!’ – शेखर सिंह

सिद्धी कापशीकर गौरव समारंभ संपन्न
पिंपरी (दिनांक : २० एप्रिल २०२५) ‘अभिजात भारतीय संगीत परमेश्वराकडे नेते! भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सव काळात सिद्धी कापशीकर यांनी संवादिनी (हार्मोनियम)वर ७५ रागांचे वादन करून विश्वविक्रम केला असला तरी ही फक्त सुरुवात आहे!’ असे गौरवोद्गार पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काढले. काही दिवसांपूर्वीच सिद्धी कापशीकर या युवतीने इंग्लंडमध्ये सलग दहा तास तेवीस मिनिटे आणि बावीस सेकंद संवादिनी (हार्मोनियम) वादनाचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. आपल्या विद्यालयाच्या माजी कार्यकर्तीच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतल्याप्रीत्यर्थ ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी आणि कापशीकर कुटुंबीयांच्या वतीने ‘यश हे अमृत झाले!’ या कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विधानपरिषद आमदार उमा खापरे, ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर, शीतल कापशीकर, विवेक कापशीकर आणि उत्सवमूर्ती सिद्धी कापशीकर यांची व्यासपीठावर तसेच माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक अमित गावडे, राजेंद्र गावडे,
शीतल शिंदे, शर्मिला बाबर, भारती फरांदे, शाहीर प्रकाश ढवळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. उमा खापरे यांनी, ‘सिद्धीने आपल्या वाद्यवादनातील वैयक्तिक विक्रमाने केवळ पिंपरी – चिंचवडचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार नेले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो!’ अशी भावना व्यक्त केली. मनोज देवळेकर यांनी, ‘मनात जिद्द असल्याशिवाय विक्रम  घडत नाहीत, याचा प्रत्यय सिद्धीने दिला आहे. वाद्यवादनातील भारतीयांच्या वतीने झालेला हा एकमेव वैयक्तिक गिनीज विक्रम असल्याने युवकांसाठी हे प्रेरणादायी आहे!’ असे मत व्यक्त केले. ज्ञान प्रबोधिनीचे अभिव्यक्ती प्रकल्प प्रमुख मिलिंद संत यांनी, ‘कोणताही कलाकार कुटुंब, शिक्षक, समाज आणि त्या कला क्षेत्रातील समृद्ध परंपरा यांच्या पाठबळावर प्रगतिपथावर वाटचाल करीत असतो. त्यामुळेच विक्रमासोबतच त्याने त्या कलेचे आस्वादक निर्माण केले पाहिजेत!’ अशी अपेक्षा व्यक्त केली. शीतल कापशीकर यांनी, ‘सिद्धीचे टोपणनाव नाव मनू असून मनकर्णिका अर्थात झाशीची राणी वयाच्या बाविसाव्या वर्षी इंग्रजांविरुद्ध लढली होती; आणि मनकर्णिका उर्फ सिद्धीने बाविसाव्या वर्षी इंग्लंडमध्ये जाऊन विश्वविक्रम प्रस्थापित केला, हा सुखद योगायोग आहे; तसेच परमेश्वरी संकेत आहे. ती आपल्या संगीतसाधनेचा उपयोग जगाचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्यासाठी करेल!’ अशी भावना व्यक्त केली. 
स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शिवराज पिंपुडे यांनी प्रास्ताविकातून, ‘सिद्धीची संगीतातील रुची ओळखून तिच्या आईबाबांनी योग्य वेळी प्रोत्साहन दिल्यामुळे ती विश्वविक्रमाला गवसणी घालू शकली!’ अशी माहिती दिली; तर केंद्र व्यवस्थापक आदित्य शिंदे यांनी, ‘अथक मेहनत, निष्ठा अन् समर्पण यांतून प्राप्त झालेले हे यश आहे, हे मी स्वतः लंडनला जाऊन अनुभवले आहे!’ अशी ग्वाही दिली. याप्रसंगी सिद्धीचे विधिवत औक्षण करण्यात आले. ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने विशेष कौतुकपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून उत्सवमूर्तीला गौरविण्यात आले. माधवी पोतदार लिखित कौतुकपत्राचे मयूरी जेजुरीकर यांनी वाचन केले. स्वप्ना पेंढारकर यांनी गौरवपर स्वरचित कवितेचे वाचन केले; तर मंजुषा कापशीकर यांनी सिद्धीच्या बालपणातील आठवणींना उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना सिद्धी कापशीकर यांनी संवादिनीवर सरस्वती आणि देस या रागांचे सुरेल सादरीकरण करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. त्यानंतर ‘मनमंदिरा…’ या गीताने आपल्या मनोगताचा प्रारंभ करून आईकडून संगीताचा वारसा मिळाला; तर बाबांकडून भक्कम आर्थिक पाठबळ मिळाले. ज्ञान प्रबोधिनीत संगीताचा पाया घातला गेला. पद्मभूषण डाॅ. एल. सुब्रमण्यम् आणि गायिका कविता कृष्णमूर्ती यांच्याकडून संगीताचे धडे घेत असल्याचे नमूद केले. विशेष मुलांना सांगीतिक उपचार देण्यासाठी मी माझ्या संगीत साधनेचा वापर करणार असल्याचा मानस व्यक्त करून रामनामाचा गालिचा अन् सरस्वतीची प्रतिमा समोर ठेवून विश्वविक्रमाला सामोरे गेल्याची माहिती दिली.
स्वाती मोरे यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी संयोजनात सहकार्य केले. सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!