शबनम न्यूज :प्रतिनिधी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ थेरगाव-दत्तनगर येथील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत काढलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. चारही उमेदवारांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.

गणेशनगर, मयूरेश्वर मंदिर, एकता कॉलनी, शिव कॉलनी, गुजरनगर या भागात ही प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रभाग २४ थेरगाव-दत्तनगरमधील शिवसेनेचे उमेदवार विश्वजीत बारणे, नीलेश बारणे, शिवसेना पुरस्कृत रुपाली लालासाहेब गुजर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माया बारणे हे चारही उमेदवार सहभागी झाले होते. या रॅलीत तरुण, महिला, ज्येष्ठांसह नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभाग क्रमांक २४ मधील निवडणूक लक्षवेधी होत आहे. . माजी नगरसेवक संतोष बारणे, मंगेश बारणे, संभाजी बारणे, महेश बारणे यावेळी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘थेरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. या विकास कामांमध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. माझे थोरले बंधू हिरामण बारणे, मी २० वर्षे नगरसेवक म्हणून काम केले. नीलेश बारणे, माया बारणे यांनी दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. बोट क्लब, जलतरण तलाव सुरु केला. क्रिकेट अॅकडमी सुरु केली. पायाभूत सुविधा सक्षम केल्या. अंतर्गत रस्ते, विद्युतचे खांब या सुविधांना प्राधान्य दिले आहे. आगामी काळात शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळित व सक्षम केली जाईल. मेट्रोचे जाळे विस्तारले जाईल. प्रदूषण कमी करणे, वाढत्या लोकसंख्येसाठी अधिकचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुळशी धरणातून पाणी आणले जाईल. रावेत बंधाऱ्यातून पाणी उचलले जाते. ते अतिशय अशुद्ध असते. शिवणे बंधाऱ्यापर्यंत बंद पाईपलाईन मधून पाणी आणले जाईल. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. थेरगाव परिसराला पुरेसा, दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत’.
उमेदवार विश्वजीत बारणे, नीलेश बारणे, माया बारणे यांनीही नागरिकांशी संवाद साधला. प्रभागाचा विकासाचे व्हिजन आमच्याकडे तयार आहे. अनेक कामे केली आहेत. अनेक कामे करायची आहेत. प्रभागाला आदर्श प्रभाग करण्याचा मानस आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची ताकद आपल्या पाठिशी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे सहकार्य आपल्याला आहे. त्यामुळे विकास निधीची कमतरता भासणार नाही. आम्ही चारही उमेदवार मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणार आहोत. या निधीतून प्रभागाचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी ग्वाही चारही उमेदवारांनी दिली.


