मतदारांशी थेट संवाद साधत समस्या जाणून घेतल्या
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या चारही अधिकृत उमेदवारांचा प्रचार वेगाने सुरू आहे. पिंपळे सौदागर परिसरात अनिता संदीप काटे, शत्रुघ्न बापू काटे, कुंदा संजय भिसे आणि संदेश काटे यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून परिसरात निवडणूक वातावरण अधिकच सक्रिय झाले आहे.
या प्रचार दौऱ्यात उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व पार्किंग, स्वच्छता, स्ट्रीट लाईट्स आदी विविध प्रश्न नागरिकांनी उमेदवारांसमोर मांडले. उमेदवारांनी या सर्व समस्या लक्षपूर्वक ऐकून घेत त्यांची नोंद केली व निवडून आल्यानंतर त्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी बोलताना अनिता संदीप काटे यांनी सांगितले की, “नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि प्रश्न ऐकताना आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. जनतेशी थेट संवाद साधणे हीच खरी लोकशाहीची ताकद असून हा संवाद नागरिकांशी असलेल्या नात्याला अधिक बळकटी देतो. एकत्रितपणे काम करून प्रभाग क्रमांक २८ साठी उज्वल आणि सुरक्षित भविष्य घडवण्याची प्रेरणा या संवादातून मिळत आहे.”
या भेटीगाठी दरम्यान अनेक नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली. महिलांपासून तरुण, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पिंपळे सौदागर परिसरातील या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून “विकास, विश्वास आणि संवाद” या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


