शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैशालीताई अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक पाचच्या अधिकृत उमेदवारांसाठी आयोजित कोपरा सभेत प्रियांका बारसे यांनी महिलांशी संवाद साधला. या कोपरा सभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
या सभेत वैशालीताई अजित गव्हाणे यांनी मार्गदर्शन करत महिलांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महिलांच्या आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक शौचालये आदी मूलभूत सुविधांवर त्यांनी विशेष भर दिला.

यावेळी उमेदवार प्रियांका ताई बारसे यांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. घरगुती पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, अंगणवाडी, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, स्ट्रीट लाईट्स, रस्त्यांची दुरवस्था अशा अनेक प्रश्न महिलांनी मांडले. या सर्व समस्यांची नोंद घेत निवडून आल्यानंतर प्रभागातील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार प्रियांका ताई बारसे यांनी व्यक्त केला.
“महिलांचा विकास म्हणजेच समाजाचा विकास आहे. महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक ५ चा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे प्रियांका ताई बारसे यांनी सांगितले.

या कोपरा सभेला अश्विनी गवळी, श्वेता फुगे, मोना फुगे, कोमल फुगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी प्रियांका ताई बारसे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत त्यांना भरभरून पाठिंबा देण्याचा निर्धार केला.
कोपरा सभेमुळे प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून महिलांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.


