शबनम न्यूज:प्रतिनिधी
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा, फुले शाहू आंबेडकरांचे विचार पुढे नेणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथे केले.पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे,डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ पिंपरी गावात झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, प्रभाग क्रमांक 21 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे,डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम,शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, गिरीजा कुदळे, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, नाना काटे,राम आधार धारिया , श्रीरंग शिंदे, विजय कापसे, शांती सेन,विजय लोखंडे, राणी कापसे उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप वाघेरे यांनी आपले विरोधक आता कोणतेही वाद निर्माण करतील. पण कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले. त्याचा उल्लेख करून अजित पवार म्हणाले की, या शहराचे मी 25 वर्ष नेतृत्व केले. जात धर्मभेद न मानता अनेकांना पदे दिली. साधा पानपट्टी चालविणारे अण्णा बनसोडे आता विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. कविचंद भाट यांना महापौर पद दिले.आदिवासी व्यक्तीला महापौर पद दिले.राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा, फुले शाहू आंबेडकरांचे विचार पुढे नेणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. व पिंपरी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन पवार यांनी केले.


