अजित गव्हाणे यांचे आवाहन; प्रभाग 5 मध्ये प्रियांका ताई बारसे यांच्या प्रचाराला उधाण
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, त्यांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः गवळी नगर येथील स्वामी समर्थ सोसायटीमध्ये आयोजित कोपरा सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
काल रविवारचे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितभाऊ गव्हाणे यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत होम टू होम भेटी देत संपूर्ण प्रभाग अक्षरशः पिंजून काढला. प्रत्येक घरापर्यंत पोहोचत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासात्मक भूमिकेची माहिती दिली.

या घरोघरी भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता संपूर्ण प्रभाग राष्ट्रवादीमय झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. अनेक ठिकाणी नागरिकांनी अजितभाऊ गव्हाणे यांचे मनापासून स्वागत केले.
या कोपरा सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितभाऊ गव्हाणे यांनी उपस्थिती लावत वातावरण अधिकच भारावून टाकले. यावेळी बोलताना अजितभाऊ गव्हाणे यांनी गवळी नगर प्रभागातील चारही अधिकृत उमेदवारांना ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने निवडून द्या, असे आवाहन नागरिकांना केले.
“हे चारही उमेदवार म्हणजे मीच आहे, हे लक्षात ठेवा. मी तुमच्या सर्वांसोबत ठामपणे उभा आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

कोपरा सभेदरम्यान “घड्याळाला मत – विकासाला मत”, “प्रियांका ताई बारसे आगे बढो – हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या सभेचे वैशिष्ट्य ठरले.
प्रियांका ताई बारसे यांनी यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठीच्या संधी याबाबत आपली भूमिका मांडली. मागील काळात केलेल्या विकासकामांचा आढावा देत पुढील काळात प्रभाग क्रमांक 5 चा सर्वांगीण विकास करण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांनीही आपले प्रश्न, सूचना आणि अपेक्षा मांडत प्रियांका ताई बारसे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्यांशी थेट संवाद, उपलब्ध नेतृत्व आणि कामाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा ही त्यांची ओळख असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
एकूणच स्वामी समर्थ सोसायटीतील कोपरा सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता, प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने वातावरण अधिक मजबूत होत असून, प्रियांका ताई बारसे आणि त्यांच्या सहकारी उमेदवारांना जनतेचा ठाम कौल मिळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


