थेरगाव परिसरात भाजपच्या चारही उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या चारही अधिकृत उमेदवारांचा प्रचार वेगात सुरू असून, या प्रचाराला मतदारांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मनिषाताई प्रमोद पवार, सोनालीताई संदीप गाडे, अभिषेक बारणे आणि तानाजी बारणे या चारही उमेदवारांनी एकत्र येत प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली असून संपूर्ण प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
थेरगाव परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान विकासाच्या कामांना पुन्हा संधी द्या, प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. या प्रचार फेरीत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला.

घरोघरी जाऊन थेट जनसंवाद साधत उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. मागील कार्यकाळात राबविण्यात आलेली विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि महिलांसाठीच्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली. विशेषतः महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी आणि सुरक्षित, सुव्यवस्थित प्रभाग हा प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.
प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले, तर काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावरून मतदारांचा भाजप उमेदवारांवरील विश्वास स्पष्टपणे दिसून येतो.
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रभाग क्रमांक 23 मध्ये सातत्याने विकासकामे करणारे, जनतेशी थेट जोडलेले आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून भाजपच्या या चारही उमेदवारांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार पुन्हा एकदा भाजपच्या या चारही उमेदवारांना प्रतिनिधित्वाची संधी देतील, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आपली मजबूत पकड निर्माण केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.


