अनिताताई संदीप काटे यांच्या प्रचारार्थ नागरिकांच्या भेटीगाठी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून, भाजपच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे यांच्या प्रचारार्थ शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली विविध सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या.
या प्रचार दौऱ्यादरम्यान सोसायटीतील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, पार्किंग तसेच परिसरातील मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. यावेळी अनिताताई संदीप काटे यांनी नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा विश्वास दिला.

या भेटीगाठीदरम्यान सोसायटीतील नागरिकांकडून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक नागरिकांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला भक्कम साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला. हा प्रतिसाद पक्ष कार्यकर्त्यांसाठी आनंददायी आणि अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पिंपळे सौदागर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून, प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना न्याय देणे हेच पक्षाचे ध्येय आहे. “भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर भाजपचा भर असून, अनिताताई संदीप काटे या प्रभागाच्या विकासासाठी सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्व देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रचार भेटीगाठींमुळे प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होत असून, येणाऱ्या निवडणुकीत भाजपला अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.


