शिवनगरी विभागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या अधिकृत उमेदवारांची प्रचार फेरी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. भाऊसाहेब भोईर, मनीषा आरसुळे, शेखर चिंचवडे आणि शोभाताई वाल्हेकर या चारही उमेदवारांच्या उपस्थितीत आज रविवार, दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी ही प्रचार फेरी शिवनगरी विभागात आयोजित करण्यात आली होती.
भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रचार फेरीची सुरुवात हनुमान स्वीट होम चौक, बिजलीनगर येथून करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यांनी सजलेल्या या रॅलीचा समारोप साईराज कॉलनी येथे करण्यात आला.

या प्रचार फेरीला मतदार व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, कामगार वर्ग मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. “राष्ट्रवादीचा विजय असो”, अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, महिला व युवकांसाठी रोजगार आणि सुरक्षा या महत्त्वाच्या प्रश्नांवर विशेष भर दिला.
प्रभागाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने आयोजित या प्रचार फेरीत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनशक्ती आणि जनाधार अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकूणच प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता या चारही उमेदवारांच्या विजयाची लाट निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.


