शबनम न्यूज
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ मधून महापालिका निवडणुकीसाठी नम्रता रवी भिलारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र भारतीय जनता पार्टीकडून एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला. वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून पक्षहिताला प्राधान्य देत त्यांनी दाखवलेला संयम, मनाचा मोठेपणा आणि भारतीय जनता पार्टी तसेच जगताप कुटुंबावरील निष्ठा ही बाब पक्षात व कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी नम्रता रवी भिलारे व रवी रामदास भिलारे यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल उंचावले. यावेळी आमदार जगताप यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुम्ही पक्षासाठी घेतलेला निर्णय हा धाडसी आणि अनुकरणीय आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी मोठ्या भावासारखा ठामपणे उभा आहे. समाजकार्यासाठी तुम्हाला पूर्ण ताकद दिली जाईल आणि भविष्यात योग्य वेळी तुमचा नक्कीच सकारात्मक व न्याय्य विचार केला जाईल.” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
नम्रता भिलारे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, भारतीय जनता पार्टी ही केवळ पक्ष नसून एक कुटुंब आहे. पक्षाच्या निर्णयाचा सन्मान राखत, संघटन मजबूत करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक २३ मधील विकासकामांसाठी आपण यापुढेही सक्रियपणे काम करत राहू. तसेच भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात पूर्ण ताकदीने सहभागी होऊन पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे पक्षातील संघटनात्मक शिस्त, निष्ठा आणि नेतृत्वावरील विश्वास अधोरेखित झाला असून, प्रभाग क्रमांक २३ मध्ये भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र यानिमित्ताने स्पष्टपणे दिसून येत आहे.


