शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रं ०९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार या नात्याने प्रचाराच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक नऊ मधील नेहरुनगर येथील कुलदीप सोसायटी परिसरात चारही उमेदवारांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी निवडून आल्यास प्रभागासाठी आणि नागरिकांसाठी कोणत्या प्रकारे काम केले जाईल, विकासाचा नेमका आराखडा व दीर्घकालीन व्हिजन काय आहे याची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली.
या प्रचार दौऱ्यात सिद्धार्थ अण्णा बनसोडे, डॉक्टर वैशाली घोडेकर, सारिका ताई मासुळकर आणि राहुल हनुमंतराव भोसले हे चारही उमेदवार सहभागी होते. उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत मतदारांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती, खराब रस्ते, कचरा संकलन व स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोयी, तसेच तरुणांसाठी रोजगार, कौशल्य प्रशिक्षण व क्रीडा सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या.

यावेळी उमेदवारांनी प्रभागात नियमित स्वच्छता मोहीम, दर्जेदार रस्ते व फुटपाथ, पथदिवे, सीसीटीव्ही बसवणे, महिला व मुलांसाठी सुरक्षित वातावरण, आरोग्य शिबिरे, वृद्धांसाठी सुविधा केंद्रे आणि युवकांसाठी क्रीडांगणे व व्यायामशाळा उभारण्यावर भर दिला जाईल असे आश्वासन दिले. तसेच नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी स्वतंत्र संपर्क व्यवस्था आणि सातत्याने प्रभागात उपस्थित राहण्याची ग्वाही देण्यात आली.
नागरिकांनीही आपल्या समस्या थेट उमेदवारांपर्यंत मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. हा जनसंवाद दौरा प्रभागातील विकासाच्या दृष्टीने सकारात्मक ठरत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.



