शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ अंतर्गत नेहरूनगर–नूर मोहल्ला परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चारही उमेदवारांनी प्रचार फेरी काढत नागरिकांशी थेट संवाद साधला. या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे ठिकठिकाणी औक्षण करून, पुष्पहार घालून स्वागत केले.
या प्रचार दौऱ्यात सिद्धार्थ अण्णा बनसोडे, डॉक्टर वैशाली घोडेकर, सारिका ताई मासुळकर आणि राहुल हनुमंतराव भोसले हे चारही उमेदवार सहभागी होते. उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा, तरुणांसाठी रोजगार व क्रीडा सुविधांबाबत नागरिकांनी आपले प्रश्न आणि अपेक्षा मांडल्या.

यावेळी उमेदवार सिद्धार्थ अण्णा बनसोडे यांनी बोलताना सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विचार, विकासाभिमुख धोरणे आणि प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस संकल्प घेऊन आम्ही जनतेसमोर आलो आहोत. नागरिकांच्या हितासाठी, कल्याणासाठी आणि प्रभागातील प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध राहू.”
चारही उमेदवारांनी निवडून आल्यानंतर प्रभागात मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, स्वच्छ व सुरक्षित परिसर निर्माण करणे, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा, आरोग्य व शिक्षणावर भर, तसेच युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या जनसंवाद प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत असून, नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



