शबनम न्यूज | प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, अंतर्गत तक्रार निवारण समिती, महिला विकास कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी मा. माधुरीताई आवटे प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य प्रो. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी भूषविले.
आपल्या व्याख्यानात माधुरीताई आवटे म्हणाल्या की, “सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत. पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून त्यांनी स्त्री शिक्षणाची मशाल पेटवली. रात्री ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले आणि पुढे त्यांच्या सहकार्याने मुलींसाठी शाळा सुरू झाली. सुरुवातीला अवघ्या सहा मुली होत्या, मात्र भिडे, गोवंडे व परांजपे यांच्यासारख्या समाजभिमुख व्यक्तींनी शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली.”
त्या पुढे म्हणाल्या की, “सावित्रीबाईंचा विरोध ब्राह्मणशाहीला होता, ब्राह्मणांना नव्हे. त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणत सामाजिक अन्यायाला वाचा फोडली. बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करून त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी ठोस पावले उचलली. त्यांचे विचार काळाच्या खूप पुढचे होते.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रो. डॉ. प्रभंजन चव्हाण म्हणाले, “आजचा दिवस केवळ जयंती म्हणून नव्हे तर स्वतःला तपासण्याचा दिवस म्हणून साजरा करायला हवा. गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी वेचले. स्त्री-पुरुष समानतेचा विचार त्यांच्या कार्यातून प्रकर्षाने दिसून येतो.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेश्मा दिवेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. देवकी राठोड यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. सविता पाटील, डॉ. बाळासाहेब कल्हापुरे यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते. एकूण ६८ जणांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.


