spot_img
spot_img
spot_img

‘चिन्ह नव्हे तर आमचं नाव चालणार’; भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांचा ठाम विश्वास

प्रभाग २४ मध्ये भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांना चिन्हे वाटप!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“आम्ही जनतेची मने जिंकलेली आहेत. त्यामुळे चिन्ह कोणतेही असो, मायबाप जनता आमच्या कामाच्या जोरावरच आम्हाला निवडून देणार आहे” असा ठाम विश्वास भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विरोधकांनी आपणच निवडून येणार या भ्रमात राहू नये, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला आहे. यामुळे प्रभाग क्रमांक २४ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्याची तयारी करत असलेल्या करिश्मा सनी बारणे, शालिनी कांतीलाल गुजर आणि गणेश दत्तोबा गुजर यांना पक्षाचा एबी फॉर्म वेळेत प्राप्त न झाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला होता. आता निवडणूक आयोगाकडून त्यांना अधिकृत निवडणूक चिन्हे प्राप्त झाली असून ते जोमाने निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत.

दरम्यान, सिद्धेश्वर बारणे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असून ते कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांपैकी शालिनी गुजर या कपाट चिन्हावर, करिश्मा बारणे या एअर कंडिशनर चिन्हावर, तर गणेश गुजर हे कपबशी या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

“आम्ही पक्षापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे मतदार चिन्ह न पाहता आमच्यावर विश्वास ठेवून मतदान करतील,” असा विश्वास या सर्व उमेदवारांनी व्यक्त केला. तसेच भाजपचे अधिकृत व पुरस्कृत उमेदवारांचा पॅनल प्रभागात विकासाचा नवा अध्याय लिहिणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

विकासकामे, नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांचे प्रश्न या मुद्द्यांवर प्रचार अधिक तीव्र करण्यात येत असून, प्रभाग २४ मध्ये निवडणूक लढत दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!