शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या चारही अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. भाऊसाहेब सोपानराव भोईर, मनीषा राजेश आरसूळ, शोभाताई तानाजी वाल्हेकर आणि शेखर बबनराव चिंचवडे यांनी नारळ फोडून अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केली.
या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त वाल्हेकरवाडी येथील हनुमान मंदिरापासून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो”, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधा आदी विषयांवर नागरिकांनी आपली मते मांडली. निवडून आल्यानंतर या सर्व प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.
या चारही उमेदवारांचा प्रभागात चांगला जनसंपर्क असून सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल नागरिक घेत आहेत. त्यामुळेच मतदारांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः महिला भगिनी, युवक वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या प्रचारात प्रकर्षाने जाणवला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक ताकदीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे प्रभाग क्रमांक १७ मध्ये पक्षाचे वातावरण अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या चारही उमेदवारांना संधी देतील, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


