पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्याची तयारी करत असलेल्या करिश्मा सनी बारणे यांना पक्षाचा एबी फॉर्म वेळेत सादर न झाल्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. प्रशासनाच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभारामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप यावेळी करण्यात येत आहे.
करिश्मा सनी बारणे यांना भाजपकडून अधिकृत पाठिंबा असला तरी कमळ चिन्हावर निवडणूक लढवता येणार नसल्याने त्यांना वेगळ्या निवडणूक चिन्हावर मतदारांसमोर जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना भावनिक साद घालत, “चिन्ह पाहून नव्हे तर करिश्मा बारणे या नावावर विश्वास ठेवून मतदान करा,” असे आवाहन केले आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना करिश्मा बारणे म्हणाल्या की, “मी आपल्यासाठी नवीन नाही. अनेक वर्षांपासून आपल्या सुख-दुःखात सहभागी होत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेसाठी काम करत आले आहे. नागरिकांच्या समस्या, हक्क आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. जनसेवक म्हणून मी कायम आपल्या सोबत उभी राहिले आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही चिन्हाचा विचार न करता केवळ “करिश्मा बारणे” या नावावर मतदान करावे. माझे कार्य, माझी ओळख आणि जनतेशी असलेले नाते हेच माझे खरे चिन्ह आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि निष्क्रियतेमुळे अनेक उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. एबी फॉर्म वेळेत सादर न होऊ शकल्याने करिश्मा सनी बारणे यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रभाग क्रमांक २४ मधील निवडणूक लढतीत आता करिश्मा सनी बारणे या अपक्ष उमेदवार म्हणून जनतेसमोर असून, त्यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावर आणि जनतेशी असलेल्या थेट नात्याच्या बळावर त्या मतदारांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.


