शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे यांच्या प्रचारासाठी संदीप काटे यांनी प्रभागातील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन सोसायटीधारकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपची ध्येय-धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती देत मतदारांशी सविस्तर चर्चा केली.
संदीप काटे यांनी सोसायटीमधील नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, सुरक्षाव्यवस्था, स्ट्रीट लाइट, उद्याने तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सुविधा या विषयांवर सविस्तर संवाद झाला. या सर्व प्रश्नांवर प्राधान्याने उपाययोजना करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“भाजप हा केवळ आश्वासन देणारा नव्हे, तर काम करून दाखवणारा पक्ष आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, नागरी सोयी आणि विकासकामांना गती देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महापालिकेतही पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख कारभार करण्यासाठी अनिताताई संदीप काटे कटिबद्ध आहेत,” असे संदीप काटे यांनी सांगितले.
सोसायटीधारकांकडून या संवादाला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला. अनेक नागरिकांनी परिसरातील प्रश्न मांडत अपेक्षा व्यक्त केल्या तसेच येणाऱ्या काळात भाजपला भक्कम पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. “येणाऱ्या निवडणुकीत सोसायटीधारकांचा मोठा पाठिंबा आम्हाला नक्कीच मिळेल,” असा विश्वास संदीप काटे यांनी व्यक्त केला.
या प्रचारावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीचे सदस्य तसेच युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटित पद्धतीने सुरू असलेल्या प्रचारामुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून अनिताताई संदीप काटे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असल्याचे चित्र आहे.


