शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब भोईर, मनिषा आडसुळ, शोभा वाल्हेकर व शेखर चिंचवडे यांनी भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उमेदवारांनी पक्षाची दिशा, विकासात्मक धोरणे आणि निवडणूक विषयक भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, अजितदादा पवार हे दूरदृष्टी असलेले, सक्षम आणि निर्णयक्षम नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. प्रभाग क्रमांक १७ मधील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेचा विश्वास आणि सहकार्य मिळाल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उमेदवार शेखर चिंचवडे यांनी भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, भाजपा पक्षाने चिंचवड प्रभागातून मला तिकीट नाकारून मोठा अन्याय केला. अनेक वर्षे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करूनही मला डावलण्यात आले. भाजपामध्ये निष्ठेपेक्षा गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला अधिक महत्त्व दिले जाते, असा आरोप त्यांनी केला.
अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे. भाजपामध्ये केवळ सत्तेसाठी राजकारण केले जाते आणि चिंचवडच्या विकासाबाबत भाजपाचे अपयश आता जनतेसमोर आले आहे. येत्या निवडणुकीत जनतेच्या पाठिंब्यावर परिवर्तन घडवून आणू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


