शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत थेरगाव प्रभाग क्रमांक २३ मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराचा बिगुल फुंकत आपली ताकद आणि संघटनशक्ती दणक्यात दाखवून दिली. ढोल-ताशांचा कडकडाट, घोषणांचा निनाद, झेंड्यांची गर्दी आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या लोंढ्यामुळे संपूर्ण थेरगाव परिसर अक्षरशः राष्ट्रवादीमय झाला. पारंपरिक पद्धतीने नारळ फोडताच प्रचाराचा श्रीगणेशा झाला आणि निवडणूक रणसंग्रामाला औपचारिक सुरुवात झाली.
प्रभाग क्रमांक २३ मधून मालिका साखळे, विशाल बारणे, योगिता बारणे आणि प्रविण बारणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांच्या प्रचाराची सुरुवातच दमदार शक्तिप्रदर्शनातून झाल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या भव्य प्रचार प्रारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक कैलास बारणे, स्थायी समिती सभापती विलास नांदगुडे ,संभाजी बारणे ,माजी नगरसेविका उषा गजभार, तसेच शरद बारणे, नंदू बारणे, गुरुदास डोके, रामभाऊ बारणे, संजय पवार, शंकर बारणे, अशोक बारणे, गोरख पवार, अमोल सोनवणे, काळूराम बारणे, अविनाश बळीचक्र, विठ्ठल पवार, सुमित वाघमारे, बळी होळकर, माऊली साळवे, युवराज शिंदे, हर्षद बोराळे, स्वप्नील शिंदे, गणेश दारवटकर, गणेश बारणे, विकास पारखी, रोशन कांबळे, राजा मोरे, आशिष पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी, ज्येष्ठ नागरिक व थेरगावमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचाराच्या प्रारंभी पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून विजयाचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर “विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्व” या त्रिसूत्रीवर आधारित प्रचार मोहिमेची अधिकृत घोषणा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त करत ‘राष्ट्रवादी जिंदाबाद’, ‘बापूजी बुवाच्या नावाने चांगभलं’ अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले होते.
यावेळी उपस्थित नेत्यांनी थेरगाव आणि परिसरातील ज्वलंत नागरी प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. पाणीपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्था, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि सुनियोजित नागरी विकास या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. केवळ घोषणाबाजी नव्हे, तर कामातून विश्वास निर्माण करणारे नेतृत्व देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
“थेरगावचा विकास हा घोषणांवर नव्हे तर कामावर मोजला गेला पाहिजे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे, प्रशासनावर दबाव टाकून काम करून घेणारे आणि सामान्य माणसाशी नाळ जपणारे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस देणार आहे,” असा ठाम विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.
या भव्य शक्तिप्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक २३ मधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून निवडणूक लढत अधिक तीव्र आणि रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने थेरगावमध्ये आपली मजबूत पकड दाखवून दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


