ए. बी. फॉर्म गोंधळामुळे पिंपरी–चिंचवडमध्ये उमेदवारी छाननीत मोठा धक्का; प्रभाग १३ क सर्वसाधारण महिला मध्ये राष्ट्रवादी उमेदवार अडचणीत
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत आज अनेक उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागले. विशेषतः विविध पक्षांचे एबी फॉर्म वेळेत न सादर झाल्याने किंवा उशिरा दाखल झाल्यामुळे अनेक अर्ज बाद झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांना आता अपक्ष किंवा पक्षपुरस्कृत उमेदवार म्हणून वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.
(निगडी) प्रभाग क्रमांक १३ क सर्वसाधारण महिला मध्ये राष्ट्रवादी पक्षाला उमेदवारच नाही अशी स्थिती
प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी करणाऱ्या सौ. शीतल संतोष शिंदे यांना वेळेत एबी फॉर्म प्राप्त न झाल्यामुळे त्यांचा एबी फॉर्म छाननीदरम्यान बाद करण्यात आला. त्यामुळे त्या आता अधिकृत पक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकणार नाहीत. परिणामी त्यांना अपक्ष किंवा राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरावे लागणार आहे.
या घडामोडींमुळे “राष्ट्रवादीसारख्या मोठ्या पक्षाला प्रभाग क्रमांक १३ क सर्वसाधारण महिला मधून अधिकृत उमेदवारच नाही,” अशी परिस्थिती निर्माण झाली असून ही बाब पक्षासाठी मोठी राजकीय हानी मानली जात आहे.
दोन राष्ट्रवादी एकत्र येऊनही गोंधळ कायम
विशेष म्हणजे, निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यात समन्वय साधून एकत्र लढण्याची चर्चा होती. त्यानुसार अनेक ठिकाणी ‘घड्याळ’ या चिन्हाला प्राधान्य देण्यात आले. मात्र ऐनवेळी एबी फॉर्म वेळेत न मिळाल्याने उमेदवार अडचणीत सापडले.
प्रभाग क्रमांक १३ मधील शरदचंद्र पवार गटाचे लीगल सेल शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष ॲड. संतोष शिंदे यांच्या पत्नी सौ. शीतल संतोष शिंदे या सुरुवातीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने निवडणूक लढवणार होत्या. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर घड्याळ चिन्ह स्वीकारण्याचा निर्णय झाला. मात्र नियोजनाअभावी एबी फॉर्म वेळेत न मिळाल्याने त्यांची उमेदवारी अधिकृत ठरू शकली नाही.
पक्ष संघटनात्मक अपयश उघड
पिंपरी–चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरात, जिथे राष्ट्रवादी हा प्रभावी पक्ष मानला जातो, तिथेच उमेदवारांची नावे अंतिम करताना आणि एबी फॉर्म वेळेत पोहोचवताना झालेला गोंधळ हा पक्षाच्या संघटनात्मक अपयशाचे प्रतीक मानला जात आहे. विशेष म्हणजे अशा या प्रकारा मुळे प्रभाग क्रमांक 13 मध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवाराला त्याचा थेट थेट फायदा होणार आहे हेही इथे नमूद करणे महत्त्वाचे आहे.
चार उमेदवारांचा पूर्ण पॅनल उभा करण्यात अपयश येणे, तसेच महत्त्वाच्या प्रभागांमध्ये अधिकृत उमेदवारच नसणे, हे राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठे राजकीय नुकसान ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी काळात हे उमेदवार अपक्ष किंवा पक्षपुरस्कृत म्हणून कसे प्रभावी ठरतील, आणि मतदार या गोंधळाकडे कशा पद्धतीने पाहतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



