शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (वानवडी–साळुंखे विहार) येथे काँग्रेस–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जगताप चौक, वानवडी येथे होणार आहे. या निमित्ताने भव्य जाहीर सभा आणि प्रचार प्रारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रभागातून आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून केंद्री साहिल शिवाजी (प्रभाग १८ अ), जगताप रत्नप्रभा सुदाम (प्रभाग १८ ब), जांभुळकर रश्मिका प्रफुल्ल (प्रभाग १८ क) आणि जगताप प्रशांत सुदाम (प्रभाग १८ ड) हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चारही उमेदवार विकासाभिमुख विचारसरणी, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि पारदर्शक प्रशासनाच्या भूमिकेतून निवडणूक लढवत आहेत.
प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमास काँग्रेस व शिवसेना (उबाठा) पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून आघाडीची ताकद, संघटनात्मक एकजूट आणि आगामी निवडणुकीतील दिशा स्पष्टपणे मांडली जाणार आहे.
वानवडी–साळुंखे विहार परिसरातील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सेवा, स्वच्छता, महिला व युवकांचे प्रश्न यांना प्राधान्य देत सर्वसमावेशक विकासाचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात येणार आहे. लोकांच्या सहभागातून आणि विश्वासातून सक्षम व जबाबदार नगरसेवक देण्याचा निर्धार आघाडीने केला आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


