शबनम न्यूज | प्रतिनिधी
सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, नववर्षाच्या स्वागतानिमित्त सामाजिक ऐक्य, आपुलकी आणि परस्पर स्नेह जपणारा एक सकारात्मक उपक्रम शहरात पाहायला मिळाला. पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या जुन्नर, खेड, आंबेगाव, चाकण, शिरूर तसेच उत्तर पुणे जिल्ह्यातील रहिवासी, नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मावळत्या वर्षाला निरोप देत भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश विविध भागांतून आलेल्या नागरिकांमध्ये आपुलकीचे नाते अधिक दृढ करणे, सामाजिक सलोखा वाढवणे तसेच नववर्षात सकारात्मक विचारांसह पुढे जाण्याचा संकल्प करणे हा होता. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला विविध स्तरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.

या प्रसंगी सामाजिक व सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या तुषार सहाणे, सीमाताई सावळे, अश्विनीताई वाबळे, सौ. राजश्रीताई गागरे तसेच अजित गव्हाणे यांना विशेष आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची, लोकसंपर्काची व समाजासाठी केलेल्या योगदानाची उपस्थितांनी प्रशंसा केली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सन्मान सोहळा पार पडून कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणुकांचे दिवस हे स्पर्धेचे असले तरी समाजातील एकोप्याची भावना जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. मतभेद असू शकतात, मात्र मनभेद टाळून समाजहितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. नववर्ष हे नवे संकल्प, नवी ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन येते. अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास जुन्नर, खेड, आंबेगाव, चाकण, शिरूर आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. आपापसातील स्नेह, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण करत उपस्थितांनी नववर्षाचे स्वागत उत्साहात केले. संपूर्ण कार्यक्रम आनंदी, उत्साही व आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
निवडणुकीच्या गदारोळातही सामाजिक एकोपा, परस्पर आदर आणि नातेसंबंध जपण्याचा संदेश देणारा हा स्नेहमेळावा पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक जीवनात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.


